चंद्रपूर:- चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथील वलनी स्थित फार्महाऊसवर धाड मारून सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या धाडीत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मौजा वलनी स्थित सचिन वैद्य यांच्या फार्म हाऊसवर मशिनद्वारे मजा, ईगल व हुक्का बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मशिनद्वारे भेसळ करीत त्याची विक्री करीत ते या ठिकाणांहून इतरत्र पाठविण्याचे कामही चालू होते. पोलिस पथकासमोर आरोपींनी कशाप्रकारे सुगंधित तंबाखू भेसळ करतात त्याचे प्रात्यक्षिकही दाखविले.
एकूण 25 लाख 71 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त
सलमान आरिफभाई कासमानी (27 रा. आरमोरी गडचिरोली), सागर तेजराम सतिमेश्राम (23 रा. साकोली भंडारा), रोहित माणिक धारणे (22 रा. ब्रम्हपुरी), वैभव भास्कर भोयर (22 रा. आरमोरी गडचिरोली), मयुर सुरेश चाचरे (27 साकोली भंडारा), सागर संजय गडभिये (24 रा. साकोली भंडारा), खेमराज विलास चटारे (20 रा. आरमोरी गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
घटनास्थळी हुक्का, शिशा, मजा ईगल व सुगंधित खुला तंबाखू 990 किलो 800 ग्रॅम, सुगंधित तंबाखू भेसळ करणाऱ्या मशीन, कच्च्या व पक्का मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन, गुन्ह्यात वापरलेले एकूण 8 मोबाईल फोन असा एकूण 25 लाख 71 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.