चंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे एका ३६ वर्षीय युवकाने दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित मुलीच्या आजोबांचे शंकरपूर येथे दारुभट्टी समोर नाश्त्याचे दुकान आहे. दुकानाला लागणारा माल हा घरूनच पाठविल्या जात होता. मुलीच्या आईने चिमुकलीच्या हाती अंडे देत दुकानात न्यायला सांगितले होते. मुलगी आजोबांकडे गेली असता आरोपी राजीक उर्फ काल्या हा दारू पीत होता. काल्याची नजर त्या चिमुकलीवर पडली. चिमुकली घरी जात असताना तुला घरी सोडतो असे मुलीच्या आजोबांना सांगत पायी-पायी तिच्या सोबत मागे गेला. राजीव गांधी महाविद्यालयाच्या मागे निर्जन स्थळी नेत तिच्यावर आरोपीने अत्याचार केला.
सदर प्रकार चिमुकलीने आपल्या आईला सांगितला असता पीडितेच्या आईने याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी तात्काळ नराधम काल्या याला अटक केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि विनोद जांभळे व कर्मचारी करीत आहे.