नागपूर महामार्गावर दुचाकीस्वारांचा अपघात; एक ठार

भद्रावती:- नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकीला स्कार्पिओची जबर धडक होवून हा अपघात झाला.
ही घटना रविवारी (दि. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास नागपूर महामार्गावर भद्रावती शहरातील पॉवर ग्रीड जवळ घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शंकर धोंडू निकुरे (वय ५०, रा. जळका ता. वरोरा) आणि कार्तिक वसंत मोहुर्ले (दि. २४, रा. खरवड ता. वरोरा) हे दोघेजण पाहुण्यांकडे जात होते. रविवारी सकाळी दुचाकीने (क्र. एम.एच.३४ बी.डब्ल्यू. ३४४९) चंद्रपूरला जात होते. दरम्यान, भद्रावतीच्या पॉवरग्रीड जवळ येताच मोहबाळा येथील वळणावर असताना चारचाकीने (क्र. एम.एच.०५ सी. एम. १५१४) दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेले शंकर निकुरे हे जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक कार्तिक मोहुर्ले हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटेनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात हलविले. तर मृतास शवविच्छेदनाकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.
अपघातातील चारचाकी तालुक्यातील चालबर्डी येथील असून सूरज ढाकणे यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत