Click Here...👇👇👇

जमिनीच्या वादामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

Bhairav Diwase
संग्रहित छायाचित्र

जिवती:- जिवती तालुक्यातील शिवाजी करेवाड (४५) या शेतकऱ्याने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. टेकामांडवा गावातील शेतकरी शिवाजी करेवाड याने जमिनीच्या वादातून वैतागून टोकाचे पाऊल उचलले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजी करेवाड ह्याला तत्काळ गडचांदुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शिवाजीच्या वडिलांनी त्यांचे नातेवाईक सोपान करेवाड यांच्या नावावर जमीन भाडेपट्ट्याने घेतली होती, कालांतराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व पाच भाऊ त्या जमिनीचे वारसदारआहेत. त्यांच्या शेतीलगत विश्वनाथ आमनेर ह्यांची शेती आहे. आमनेर हे करेवाड ह्यांच्या शेतावर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी ते नेहमीच त्रास देतात व भांडण उकरून काढत असतात. त्रास देण्याच्या उद्देशाने ते रात्रीच्या वेळी शेतातील विजेच्या तारा कापतात, तर कधी पाण्याचे पाईप फोडून चोरी केली जाते, कधी शिवीगाळ केली जाते. ह्या संदर्भात पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करूनही ह्यावर कुठलीही कारवाई अथवा चौकशी झाली नाही, असा करेवाड कुटुंबीयांचा आरोप आहे.

९ जानेवारी च्या रात्री २० ते २५ लोक शिवाजीला मारण्याच्या इराद्याने शेतात गेले होते, मात्र कुणकुण लागल्याने शिवाजी परत गावात आला व गावातील लोकांना आपल्या जिवाला विश्वनाथ ह्यांच्याकडून धोका असून त्याने आपल्याला मारण्यासाठी माणसे पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर विश्वनाथने गावात येऊन शिवजीला शिवीगाळ केली,

 अखेरीस ९ च्या दरम्यान सदर घटनेची तक्रार दाखल करण्याकरिता पोलीस ठाण्यात गेले मात्र तिथेही तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने खचलेल्या शिवाजी करेवड ह्याने ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या भावाने म्हटले आहे.

 घटनेसंदर्भात ठाणेदार महेशकर म्हणाले की, हा शेतीचा वाद असून यासंदर्भात पोलीस काहीही निर्णय घेऊ शकत नसल्याने हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवले आहे. दोघांनाही बंदीची नोटीस दिली आहे.