Click Here...👇👇👇

नक्षल्यांनी केली बांधकाम साहित्याची जाळपोळ #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase


गडचिरोली:- जिल्ह्याच्या दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी वर्षाच्या शेवटी देखील आपला हैदोस सुरु ठेवला आहे. नक्षल्यांनी शुक्रवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा-गट्टागुडा मार्गावरील निर्माण कार्य सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावरील यंत्रसामुग्रीची जाळपोळ केली. यावेळी नक्षल्यांनी काही वाहनांची तोडफोडही करीत वाहनांना क्षती पोहोचवली.

विशेष म्हणजे नक्षल्यांनी गुरुवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केली होती. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच काल शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नक्षल्यांनी गट्टा-गट्टागुडा मार्गावरील पुलाच्या बांधकामावरील मिक्सर मशीनची जाळपोळ केली. याशिवाय जेसीबी व अन्य काही वाहनांची तोडफोडही केली.

घटनेची माहिती मिळताच गट्टा पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि तैनात पोलीसांनी सतर्कतेने घटनास्थळाकडे कूच केली. पोलीसांची चाहूल लागताच नक्षल्यांनी पळ काढला. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे या भागात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.