मजीप्रातर्फे पंपाच्या पॅनलमध्ये आवश्यक दुरुस्ती करुन गोंडपिपरीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची कार्यवाही सुरु #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase
0

गोंडपिपरी:- मागील तीन दिवसापासून जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाच्या पॅनलमध्ये बिघाड झाला असून कमी व्होल्टेजच्या समस्येमुळे गोंडपिपरी गावाचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे पंपाच्या पॅनलमध्ये आवश्यक दुरूस्ती करून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे, असे पाणीपुरवठा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

गोंडपिपरी वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाकरीता वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान कार्यक्रमातंर्गत रुपये 8.2 कोटी व रुपये 1.96 कोटी रुपये निधी सन 2017 व 2018 मध्ये नगर पंचायत, गोंडपिपरीला देण्यात आला आहे.

नगर पंचायततर्फे पूर्ण ठेव तत्वावर सदर काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे निविदा प्रक्रिया पुर्ण करून दि. 16 जानेवारी 2019 रोजी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला. तसेच वितरण व्यवस्थेच्या कामाचा कार्यादेश दि. 4 सप्टेंबर 2020 रोजी देण्यात आला आहे. काम पुर्ण करण्याचा कालावधी दि. 16 ऑगस्ट 2021 (18 महिने) पर्यंत होता.

योजनेचा स्त्रोत वैनगंगा नदीच्या काठावर नांदगाव गावापासुन 2 कि.मी. अंतरावर घेण्यात आला आहे. स्त्रोताचे ठिकाणी जाण्याकरीता रस्ता नसल्यामुळे पावसाळयात 5 महिने काम करतांना मोठी अडचण निर्माण होते. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची जागा सुरगाव या ठिकाणी घेण्यात आली. सदर जागा नगर पंचायतीने 1 वर्ष 10 महिने उशिराने उपलब्ध करून दिली. मध्यंतरी सन 2020 व 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे सुद्धा कंत्राटदाराच्या कामाची गती मंदावली होती. कामाला उशीर झाल्यामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत योजनेचे काम 95 टक्के पुर्ण झाले असून गोंडपिपरी गावात एकूण 870 नळ जोडणी देण्यात आली आहे. गोंडपिपरी गावाचे मुख्य रस्त्याला धरून दोन झोन करण्यात आले आहे. यापैकी जुन्या टाकीच्या उत्तरेकडील झोनव्दारे पाणीपुरवठा 3 महिण्यापासुन सुरळीत सुरू आहे. नविन टाकीच्या दक्षिणेकडील झोनमधील चाचणी सुरू असुन लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. आजपर्यंत योजनेवर रुपये 7.98 कोटी निधी खर्च झाल्याचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धावार यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)