Murder News: प्रेमप्रकरण, हत्या अन् मृतदेह सापडला फाट्याजवळ?

Bhairav Diwase

राजुरा:- राजुरा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमठाणा गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नितेश किसन निमकर (वय 33) या युवकाचा मृतदेह आणि त्याची मोटरसायकल सुमठाणा फाट्याजवळ आढळून आली.

मृतकाचे वडील किसन भगवान निमकर यांनी राजुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 24 एप्रिल रोजी रात्री नितेश याला फोन करून गावाबाहेर बोलावण्यात आले होते. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमठाणा फाट्याजवळ त्याचा मृतदेह व मोटरसायकल आढळली. डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा आढळल्याने खून झाल्याचा संशय बळावला. राजुरा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

तपासादरम्यान हि हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली. प्रेमप्रकरणाय मृतक अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सुमठाण्यातील नंदकिशोर चरणदास सोयाम (वय 25) याच्याविरुद्ध गुन्हा क्र. 221/2025, कलम 103(1) भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मृतक नितेश हा ऑटोचालक असून त्याच्या मागे दोन लहान मुले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास राजुरा ठाण्याचे प्रभारी आयपीएस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश नन्नावरे व त्यांची टीम करीत आहेत.