
चंद्रपूर:- घुग्घूस येथून जवळच असलेल्या उसगाव येथे महा मिनरल मायनिंग बेनिफिकेशन प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीत मे. दुर्गेश इंडस्ट्रीअल सेक्युरिटीचे कार्यरत सुरक्षा रक्षक विजय विठ्ठल माहुरे ( ३५ रा. भोयगाव) हे कामावर असतांना बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांची अचानक प्रकृती खराब झाली. त्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही वार्ता पसरताच त्यांच्या कुटुंबियांनी व गावातील नागरीकांनी रुग्णालयाजवळ गर्दी केली. संतप्त नागरीकांनी आर्थिक मोबदला मिळण्यासाठी मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर नेऊन ठेवला व आर्थिक मोबदला देण्याची मागणी रेटून धरली. याबाबत कळताच भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी घटनास्थळी धाव घेतली व ही माहिती आ. देवराव भोंगळे यांना दिली त्यांनी लगेच कंपनी व्यवस्थापनाला आर्थिक मोबदला देण्याची सूचना दिली.
त्या अनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी मृतकाच्या कुटुंबियांसह व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. बैठक दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये नगदी देण्याचे मान्य केले तसेच १५ हजार रुपये प्रति महिण्याची नोकरी पत्नीला तात्काळ देण्यात आली. त्यानंतर तणाव निवळला.