Top News

उड्डाणपूल संदर्भात कोरपना, गडचांदूर नागरिकांनी मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे घेतली भेट #chandrapur


भेट सकारात्मक; १२ मे रोजी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राजुरा ते गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग 353 चे काम सूरू आहे. या महामार्गावर विराजमान औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मोठी बाजारपेठ व 45 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहर येथे स्थानिक "समाधान पुर्ती बाजार ते वीर बाबुराव शेडमाके" चौकापर्यंत पॅक स्वरूपाच्या उड्डाणपूलाची निर्मिती होणार आहे. यासाठी हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहे. असे असताना मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी याला तिव्र विरोध दर्शवित सदर उड्डाणपूल पॅक ऐवजी पिल्लरचा व आतून खुला बनवण्यात यावा,अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे. पॅक पूलाचा निर्णय शासनाने मागे घ्यावा यासाठी 5 मे रोजी गडचांदूर शहरातील नागरिक, समस्त व्यापारी, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरातील "संविधान चौक" येथे काळी फिती लावून भव्य निषेध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते.

याच पार्श्वभूमीवर 7 मे रोजी गडचांदूर व कोरपना येथील व्यापारी बंधू, नागरिक व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी राज्याचे वन,सांस्कृतीक कार्यक्रम,मत्सय व्यवसाय तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आणि भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उड्डाणपूला संदर्भात नागरिकांचा विरोध का? याविषयी सविस्तर चर्चेद्वारे नितीन गडकरींना माहिती दिली. मंत्री गडकरी यांनीही सकारात्मकता दाखवत सदर समस्या निकाली काढण्यासाठीचे आदेश दिले.

        पॅक स्वरूपाच्या या उड्डाणपूलाची निर्मिती झाली तर व्यापार ठप्प होतील, शहर 2 भागात विभागले जाणार, आर्थिक संकट  कोसळण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. निवेदनावर ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नंतर समस्त नागरिकांच्या उपस्थितीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभाग अधिकार्‍यांची बैठक घेऊन उड्डाणपूल संदर्भात चर्चा करून नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. 

येत्या 12 मे रोजी गडचांदूर व कोरपना येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. यानंतर खुला व रेल्वे लाइनच्या वरून उड्डाणपूल होण्याची शक्यता बळावली आहे यात दुमत नाही. मंत्री नितीन गडकरी यांच्या सकारात्मक भूमिका पाहून कोरपना व गडचांदूरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भावनेचा आदर केल्याबद्दल मंत्री नितीन गडकरी, सहकार्य केल्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार तसेच महत्त्वाची भूमिका बजावणारे देवराव भोंगळे यांचे समस्त नागरिकांनी अगदी मनापासून आभार व्यक्त केले आहे. गडचांदूरकरांनी उभारलेल्या हा लढा जवळपास यशप्राप्तीकडे वाटचाल करीत असल्याने आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने