खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका #chandrapur


पालकमंत्र्यांचे विविध यंत्रणांना निर्देश


चंद्रपूर:- सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला दिले.
नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, देवराव भोंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामाला आता काही दिवसातच सुरवात होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बियाणांची टंचाई होऊ देऊ नका, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, नकली बियाणे लावले तर शेतकऱ्याचे संपूर्ण वर्ष वाया जाते. जिल्ह्यात नकली बियाणांची आवक, वाहतूक व विक्री होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणेने सजग राहावे. केवळ एक खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतली म्हणजे प्रश्न सुटतात, असे समजू नका. तर वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कृषी क्षेत्रात जास्त काम करण्याची क्षमता ठेवून जिल्ह्याचा लक्षांक वाढवून घ्यावा. तसा प्रस्ताव राज्यस्तरावर सादर करावा. आपल्या विभागाप्रती शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. तसेच मिशन जय किसान अंतर्गत आपला जिल्हा राज्यात पायोनियर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या

पुढे ते म्हणाले, सन 2022-23 मध्ये खाजगी बँकेने अतिशय कमी पीक कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या बँकेत असलेले शासकीय खाते तात्काळ काढून राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करा. पीक कर्जवाटपबाबत शेतक-यांन त्रास होता कामा नये. चंद्रपूर जिल्ह्यात उत्तम प्रतिचे धान उत्पादन होते. धान उत्पादक शेतक-यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त धान उत्पादक शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करा. बोनससाठी शेतक-यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांना सरकारच्या वतीने अनुदान दिले जाते त्यांना प्राधान्याने वीज कनेक्शन देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये पडणाऱ्या पावसावर होईल. कमी पाऊस झाला तर कसे नियोजन करायचे, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याचा सिंचन आणि कृषी विभागाने अभ्यास करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उकिरडा मुक्त गाव - खतयुक्त शिवार अभियानच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. ब-हाटे यांनी सादरीकरणात सांगितले की, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 11 लक्ष 44 हजार 300 हेक्टर आहे. यापैकी लागवडीखाली क्षेत्र 5 लक्ष 52 हजार 729 हेक्टर आहे. जिल्ह्यात 4 लक्ष 70 हजार हेक्टरवर खरीपची लागवड होत असून 1 लक्ष 27 हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात धानाची लागवड 1 लक्ष 85 हजार 516 हेक्टरवर (39.40 टक्के), कापूस 1 लक्ष 74 हजार 961 हेक्टरवर (37.16 टक्के), सोयाबीन 70 हजार 580 हेक्टरवर (15 टक्के), तूर 34 हजार 311 हेक्टरवर (7.29 टक्के), ज्वारी 2193 हेक्टरवर (0.47 टक्के) तर इतर पिके 3264 हेक्टरवर (0.69) लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये पीक कर्ज वाटपाच्या 1291 कोटी उद्दिष्टापैकी 878 कोटी 33 लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात राष्ट्रीयकृत बँक 184.78 कोटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 576.16 कोटी, ग्रामीण बँक 88.63 कोटी तर खाजगी बँकांकडून 28.76 कोटी रुपये कर्ज स्वरुपात वाटण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत