वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार #chandrapur #mul #tiger #tigerattack

Bhairav Diwase
मुल:- वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार झाल्याची घटना (दि.२९) सकाळी जिल्ह्यातील मूल तालुक्यात उघकीस आली. जानाळापासून जवळच असलेल्या फुलझरी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सुभाष लिंगाजी कडपे (वय ४२) असे या शेतमजुराचे नाव आहे. तो जानाळा येथील रहिवासी होता.

सुभाष कडपे हे जंगलालगत असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यानंतर त्यांना फुलझरीच्या दिशेने ओढत नेले. सुभाष हे घरी आले नसल्याने घराच्यांनी शोध सुरू केला. सकाळी सातच्या सुमारास फुलझरी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर, क्षेत्रसहायक औमकार थेरे, व पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा झाल्यानंतर सुभाष यांचा मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वनविभागाने सुभाषच्या कुटुंबियांना तातडीने तीस हजार रूपयांची मदत केली आहे. मूल तालुक्यात वाघांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे वनविभागाने वाघांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.