नोकरीला लावतो म्हणाला अन् 21 लाखांना गंडा घातला #chandrapur #nagpur #Fraud

Bhairav Diwase

नागपूर:- कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला त्याच्याच मित्राने साथीदारांच्या मदतीने तब्बल 21 लाख 50 हजार रुपयांचा चुना लावला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

पोलिसांनी विमल हिवसे (70) यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला. गिरीधर अंबतें (वय 45, रा. सतनामीनगर), कैलास जाधव (वय 50, रा. बुलढाणा) आणि अमोल पाटील (वय 60, रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. विमल यांचा नातू यश नोकरीच्या शोधात होता. यशचे वडील संजय हे सुद्धा यशच्या नोकरीसाठी प्रयत्नशील होते.

दरम्यान, संजय यांचा मित्र आरोपी अंबतें याचे घरी येणे-जाणे होते. तो मोठमोठ्या अधिकाऱ्यांना ओळखतो, तसेच दरवर्षी अनेक तरुणांना नोकरीवर लावून दिल्याची बतावणी करायचा. त्यामुळे संजय यांनी त्याला आपल्या मुलाच्या नोकरीबाबत सांगितले. आरोपीने यशला म्हाडा येथे कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी 19 लाख रुपये लागतील असे सांगितले. दोन लाख रुपये टोकन रक्कमही घेतली आणि विश्वास बसावा म्हणून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून दिला.

धनादेश वटलेच नाही

आरोपींनी संगनमत करून वेळोवेळी 18 लाख 50 हजार रुपये आणखी घेतले. यशला परीक्षेसाठी फार्म भरण्यास सांगितला. फार्म भरल्यानंतर परीक्षा झाली. मात्र, यश परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. आरोपींनी दुसऱ्या परीक्षेत काम होईल, अशी हमी देऊन पुन्हा तीन लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी मिळाली नाही. फिर्यादीने त्यांना पैसे परत मागितले असता आरोपींनी वेगवेगळ्या तारखेचे धनादेश दिले. मात्र, एकही धनादेश वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार करण्यात आली.