व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक फोटो आढळून आला. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित असल्याचा दावा या फोटोसह करण्यात येत आहे.
राष्ट्रपती पदावरील व्यक्तीने एखाद्या उमेदवारासह उमेदवारीचा अर्ज करताना उपस्थित असणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? असा सवालही नेटकऱ्यांकडून केला जात आहे. हा फोटो उमेदवारी दाखल करतानाचा आहे हे खरं असलं तरी नेमका अर्ज कोण व कशासाठी करतंय याबाबतची माहिती समजून घेणं आवश्यक आहे. हे तपशील आपण जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
एक राष्ट्रपती उमेदवाराचा फॉर्म भरायला जावू शकतात का? देश गुलामगिरी कडे वाटचाल चालू आहे का?*संविधानाची ऐशी की तैशी....*😡
💀🌑💀 निषेध निषेध निषेध....
असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरु केला. आम्हाला आढळले की हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या X (ट्विटर) प्रोफाइलवर शेअर केला गेला होता.
Earlier today, accompanied leaders from different parties for the filing of nomination papers of Smt. Droupadi Murmu Ji. pic.twitter.com/A83Z2Qh31F
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2022
२४ जून २०२२ च्या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, हा फोटो राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज भरतानाचा आहे. त्याच कॅप्शनसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरही हा फोटो शेअर करण्यात आला होता.
आम्हाला या घटनेचे व्हिडिओ देखील सापडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे की नाही हे देखील आम्ही तपासले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार असून १४ मे ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेच समजतेय. याचा अर्थ त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरलेलाच नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर राष्ट्रपती मुर्मू सुद्धा होत्या हा दावा तिथेच चुकीचा सिद्ध होतो.
निष्कर्ष: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर उपस्थित नव्हत्या. व्हायरल फोटो २०२२ मधील आहे, जेव्हा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी गेल्या होत्या व मोदी त्यांच्यासह उपस्थित होते.