नवी दिल्ली:- भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसंच हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर हरयाणात एकाच टप्प्यात १ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
तर दोन्ही निवडणुकांचे निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "आम्ही अलीकडेच जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या राज्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी लोकांमध्ये निवडणुकांसाठी मोठा उत्साह दिसून आला. त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे. लोकांना निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा आहे. तिथं शक्य तितक्या लवकर निवडणुका आयोजित करु असं आश्वासन आम्ही दिलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जम्मू-काश्मीरमधील मतदान केंद्रावर लागलेल्या लांबलचक रांगा हा पुरावा आहे की, लोकांना केवळ बदलच नव्हे तर त्या बदलाचा एक भाग बनून आवाजही उठवायचा आहे.
जम्मू आणि काश्मीरची स्थिती काय?
जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांपैकी 74 सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार आहेत. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये 2018 पासून विधानसभा भंग झाल्यापासून निवडणुकाच झाल्या नाहीत. इथं 2014 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी भाजप आणि पीडीपी यांच्यात युती होती. पण नंतर भाजपनं ही युती तोडली त्यामुळं सरकार कोसळलं होतं.
हरयाणाची स्थिती कशी?
हरयाणामध्ये 90 विधानसभा मतदार संघ आहेत. इथं एकूण 2.01 कोटी मतदार आहेत. हरयाणात 20,629 मतदान केंद्र असतील प्रत्येक मतदार केंद्रावर सगळ्या सुविधा आयोगाकडून पोहोचवल्या जातील. इथं 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांचं मतदान घरी जाऊन घेतलं जाणार आहे.
हरयाणात भाजप आणि जजपा यांचं युती सरकार होतं. पण याच वर्षी या दोन्ही पक्षांची युती तुटली. तर दुसरीकडं भाजपनं मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून नायबसिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं होतं.