गडचिरोली:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपद स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यविषयक हेळसांड सहन करावी लागत आहे. एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही येथील जखमी झालेल्या इसमास दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यास खाटेची कावड करुन तीन किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करावा लागल्याचा विदारक प्रकार उघडकीस आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही चांगल्या रस्त्यांचा अभाव आहे. कुठे नाल्यावर पूल नसल्याने दोराच्या साह्याने नागरिकांना पुरातून वाट काढावी लागते, तर कुठे रस्ताच नसल्याने जंगलातील पायवाटेने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर ही स्थिती अधिकच बिकट असते. एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही या गावाला जाण्यासाठीही पक्का रस्ता नाही. तेथील मनिराम रामा हिचामी(३५) हा त्याच्या शेतात ट्रॅक्टरने चिखल करीत असताना ट्रॅक्टर उलटला. यामुळे मनिरामच्या कंबरेला जबर दुखापत झाली. सोबतच्या नागरिकांनी जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतू तेथील रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला घेऊन गडचिरोलीला गेली होती. त्यामुळे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी खाटेची कावड बनवून मनिरामला कसूरवाही गावापर्यंत जंगलातून तीन किलोमीटरची पायपीट करीत आणले. त्यानंतर जारावंडीच्या डॉक्टरांनी परिचारिकेचे खासगी वाहन पाठवून त्यातून मनिरामला जारावंडीत आणण्यात आले. तेथे प्रथमोपचार करुन त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.