गडचिरोली:- कोरची - गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-कोरची राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात गरोदर महिला प्रियंका विनोद मडावी(२५) घेऊन जाणारी रुग्णवाहिका फसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रुग्णवाहिकेतील महिलेला तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही रुग्णवाहिका चिखलातून बाहेर काढण्यात यश आले.
गरोदर महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका फसली:
प्रियंका विनोद मडावी या गरोदर महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाकडे जात होती. मात्र, चिखलाने भरलेल्या रस्त्यावर अचानक रुग्णवाहिका अडकून पडली. टायर चिखलात रुतल्याने ती पुढे सरकू शकली नाही. यामुळे रुग्णवाहिकेतील महिलेच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
ट्रॅक्टरने काढली रुग्णवाहिका:
स्थानिक नागरिकांनी ही परिस्थिती पाहिली आणि तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी ट्रॅक्टर बोलावून घेतला आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने रुग्णवाहिका चिखलातून बाहेर काढली. त्यानंतर ती रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना झाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.