विविध आघाड्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर
चंद्रपूर:- भाजपाने चंद्रपूर महानगरात जिल्हाध्यक्षांनी भाकरी फिरवली असून विविध आघाड्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत. या निवडीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपा चंद्रपूर महानगर यादी:- https://drive.google.com/file/d/1-2HwSDiZVJzDpc-98e4yfSfbIYdA6jTi/view?usp=drivesdk
जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वाखालील या नवीन टीममध्ये विधानसभा प्रमुख म्हणून दशरथसिंह ठाकूर, तर महिला आघाडीच्या विधानसभा प्रमुख म्हणून सौ. वंदना हात्गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चा प्रमुखपदी सौ. छबुताई वैरागडे यांची निवड झाली असून, किसान मोर्चाचे प्रमुख म्हणून संजय बोरघाटे काम पाहतील. तसेच, युवा मोर्चाची जबाबदारी मयूर हेपट (वाढई) यांना देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आघाडीच्या प्रमुखपदी सौ. विमल काटकर, अनुसूचित जमाती प्रमुखपदी जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक आघाडी प्रमुखपदी राशेद हुसेन, ओ.बी.सी. आघाडी प्रमुखपदी विनोद शेरकी, आणि उत्तर भारतीय आघाडीची जबाबदारी उग्रसेन मथुराप्रसाद पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीशी असलेल्या अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांचा समावेश नाही, त्यामुळे त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.