Accident News: चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Bhairav Diwase

भंडारा:- रोजप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीवर काळाने झडप घातली आहे. पावसामुळे रस्त्यावर झालेल्या चिखलात सायकल स्लिप झाली. यामुळे खाली पडताच ट्रॅक्टरने धडक दिली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या बाम्हणी येथे घडली आहे. तर तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी थोडक्यात बचावल्या आहेत.


भंडारा जिल्ह्यातील बाम्हणी येथे सदरची घटना आज सकाळी घडली. सिमरन श्याम ठवकर (वय १५) असे अपघातात मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान सिमरन हि रोज सकाळी सायकलने शाळेत जात असायची. त्यानुसार आज देखील सकाळी ती चार मैत्रिणीसोबत सायकलवरून शाळेकडे निघाली होती. पण, काही अंतरावर गेल्यानंतर नियतीने घात केला आणि सिमरनला जीव गमवावा लागला आहे.


रस्त्यावरील चिखलाने झाला घात

दरम्यान पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. रस्त्यावरील चिखलामुळे सिमरनची सायकल स्लीप झाली आणि ती खाली कोसळली. याच वेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागचा लोखंडी भाग सिमरनच्या डोक्याला लागला. यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सोबतच्या इतर मैत्रिणी थोडक्यात बचावल्या. हा हृदयद्रावक अपघात बाम्हणी रस्त्यावर घडला.