चंद्रपूर:- महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखु इत्यादी अन्नपदार्थांच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी घातलेली असून 12 जुलै 2024 च्या अधिसुचनेनुसार सन 2024-25 मध्ये देखील उपरोक्त प्रतिबंध ठेवला आहे. जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अधिसूचनेतील नमूद तरतुदींची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येत असून 3 लक्ष 27 हजार 285 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी.सातकर यांनी 22 ऑगस्ट रोजी हाजी अनवर रज्जाक आलेख (विक्रेता) वार्ड क्र. 6, झुल्लूरवार कॉम्प्लेक्स मागे, गडचांदूर येथे तपासणी केली असता होला हुक्का शिशा तंबाखु (सुगंधित तंबाखु), ईगल हुक्का शिशा तंबाखु, मजा 108 हुक्का शिशा तंबाखु, विमल पानमसाला इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीकरीता साठविल्याचे आढळून आले. सदर अन्नपदार्थांचे अनौपचारिक नमुने विश्लेषणास्तव घेवून उर्वरीत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा एकूण किंमत 3 लक्ष 27 हजार 285 रुपये, प्रतिबंधित करून ताब्यात घेतला आहे. सदर घटनेबाबत गडचांदुर पोलिस स्टेशन येथे एफआयआर नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
❤️
चंद्रपूर जिल्हयातील कोणीही प्रतिबंधित अन्न पदार्थ जसे खर्रा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, सुगंधित सुपारी संबंधित कोणताही व्यवसाय करु नये, अन्यथा कठोर कारवाई घेण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी. सातकर यांनी कळविले आहे.