पोंभूर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा वनक्षेत्रातील नाल्यातून अनेक दिवसांपासून अवैध रेती उपसा आणि वाहतूक होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे वनरक्षक यांनी धाड टाकून अवैध रेती भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त करत दोघांविरूद्ध कारवाई केली आहे. यात चिंतलधाबा येथील रोशन वासुदेव ठेंगणे व प्रवीण वासुदेव ठेंगणे रा. चिंतलधाबा असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे.
पोंभूर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चिंतलधाबा येथील वनक्षेत्र कक्ष ११९ मधील शिव नाल्यामध्ये अवैधरित्या रेतीचा उपसा करुन वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती चिंतलधाबा बीटच्या वनरक्षक मेघा वासेकर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अवैध रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर जंगलातून निघताना आढळून आले. सदर दोन्ही ट्रॅक्टर जप्त करुन ट्रक्टर मालक रोशन वासुदेव ठेंगणे यांची विना नंबरची ट्रॅक्टर व प्रवीण वासुदेव ठेंगणे यांची ट्रॅक्टर क्र.(एम एच.३४ ओ.डी- ७२५६) रा. चिंतलधाबा ता.पोंभूर्णा यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) वनअपराध अन्वये कारवाई करण्यात आली. व त्यासंबंधीत पिआर फाडण्यात आले. सदरची पुढील कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनाखाली पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार करीत आहेत.