चंद्रपूर:- दिवाळीमध्ये फटाके मोठ्या प्रमाणात फटाके उडविली जातात. अनेकजण उत्साहात कुत्री, गायी व म्हशींच्या शेपटीला फटाके लावून उडवतात. प्राणी घाबरला की हसतात. पण असे करणे वन्यजीव संरक्षण कायदा (१९७२) अंतर्गत गुन्हा असून, तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
अनेकवेळा फटाके फोडताना लोकांना इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र, आजूबाजूला असलेल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मोठ्या आवाजाचे फटाके, यासोबतच प्रचंड धूर करणाऱ्या फटाक्यांमुळे ज्याप्रमाणे माणसावर विपरित परिणाम होतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या प्राण्यांवरही विपरित परिणाम होतात. अनेकवेळा जाणूनबुजून काही समाजकंटक मुक्या प्राण्यांना इजा होईल, अशा पद्धतीने फटाके फोडतात. त्यामुळे प्राण्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते.
प्राणी सैरावैरा पळाल्यास काय कराल?
फटाक्यांच्या आवाजाने घाबरून अनेकवेळा कुत्रा आणि मांजर रस्त्यावर सैरावैरा धावू लागतात. त्यात त्यांचा अपघात होऊ शकतो. प्राणी संग्रहालय परिसराच्या बाजूला फटाके वाजवू नयेत. मोठ्या आवाजाचे फटाके सहसा फोडू नयेत. फटाके फोडताना कुत्रे किंवा मांजर झोपलेले असल्याने त्यांना उठवावे.
प्राणीही घाबरतात
फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे घाबरून कुत्र्यांचे अंग थरथरणे, लाळ गळणे, शांत ठिकाणी लपून बसणे, मोठ्याने ओरडणे, उपाशी राहणे यासारखे प्रकार कुत्र्यांमध्ये दिवाळी सणादरम्यान दिसून येतात. तसेच आवाजामुळे अनेकदा पाळीव कुत्री घर सोडून पळून जातात.