Mul News: मुल शहराचा जागरूक आवाज आज ‘शांत’

Bhairav Diwase
मुल:- मुल शहरातील सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत असणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अमित राऊत यांचे मध्यरात्री १२.३० वाजता दुःखद निधन झाले. ते अवघे काही महिने कोमात होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.


सहा महिन्यांपूर्वी एमआयडीसी परिसरात झालेल्या एका अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर ते कोमामध्ये गेले होते आणि सातत्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


अमित राऊत यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण मुल शहरावर शोककळा पसरली आहे. सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेणारे, लोकांसाठी सहज उपलब्ध असणारे आणि सकारात्मक दृष्टीकोनातून काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची मूल शहरात एक वेगळी ओळख होती. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी नेहमी लोकहिताचा आवाज बुलंद केला होता. पत्रकारितेमध्येही त्यांचा स्पष्ट आणि सजग दृष्टिकोन सर्वांना जाणवत असे.


त्यांच्या निधनामुळे मुल शहराने एक जागरूक, संवेदनशील आणि लोकहितासाठी तत्पर असणारा युवा आवाज गमावला आहे, अशा भावना नागरिक, सामाजिक बांधव आणि पत्रकार मित्रमंडळींतून व्यक्त होत आहेत. अमित राऊत यांच्या मागे पत्नी, लहान मुलगा, आई आणि भाऊ असा परिवार आहे.


त्यांचा अंत्यविधी आज दुपारी १२.३० वाजता मूल येथील उमा नदी घाटावर पार पडणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.