राजुरा:- कर्तव्य आणि जबाबदारी या दोन शब्दांचा अर्थ एका नवरदेवाने आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. बातमी आहे राजुरा नगर परिषदेच्या निवडणुकीतून.
'आधी मतदान, मग शुभ मंगल सावधान!' हा संदेश राजुरा शहरातील जवाहर नगर येथील सोळुंके कुटुंबाने दिला आहे. कुटुंबात विवाहाची लगबग आहे, नवरदेवाला हळद लागली आहे, पण लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचे कर्तव्य त्यांनी विसरले नाहीत.
राजुरा नगर परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक रहिवासी साहिल सोळुंके यांनी आपल्या विवाहापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आधी मतदान केले. एकीकडे लग्नाचे विधी सुरू असताना, सोळुंके कुटुंबीयांनी केवळ साहिललाच नाही, तर घरातील प्रत्येक सदस्याला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केले. या कुटुंबाने मतदान करून एक अत्यंत उत्कृष्ट संदेश समाजाला दिला आहे.
"मतदान म्हणजे फक्त हक्क नाही, ते आपलं कर्तव्य आहे," साहिल सोळुंके यांच्या या कृतीने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. खरंच, लग्नाच्या घाईतही लोकशाही मूल्यांना महत्त्व देणारे साहिल सोळुंके हे आजच्या तरुणांसाठी एक आदर्श ठरले आहेत.
साहिल सोळुंके आणि त्यांच्या कुटुंबाचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकशाहीच्या या उत्सवात आपले कर्तव्य बजावणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

