Gadchandur News: गडचांदूरमध्ये मतदानानंतर मोठा राडा; भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या भावावर हल्ला!

Bhairav Diwase

कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात मतदानानंतर लगेचच एक धक्कादायक हिंसाचाराची घटना घडली आहे. भाजपचे प्रभाग नऊचे उमेदवार सुरज पांडे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांच्या भावाला, प्रकाश निमजे यांना विट फेकून मारले, ज्यात प्रकाश निमजे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी रुग्णालयात दाखल:

या हल्ल्यात निमजे यांच्या डाव्या कानाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशनवर नागरिकांची गर्दी आणि मागणी:

या घटनेनंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. संतप्त नागरिकांनी आरोपी सुरज पांडे याला लोकांच्या स्वाधीन करा या मागणीसाठी पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली आहे.

शहर बंदची हाक:

या हिंसक घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी म्हणून आंदोलनकर्त्यांनी शहरातून रॅली काढली आहे आणि बाजार बंदची हाक दिली आहे. गडचांदूर शहरात आज कडकडीत बंद पाळला जात आहे. सध्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.