आरमोरी:- आरमोरी तालुक्यातील इंजेवारी परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, २ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. कुंदाबाई खुशाल मेश्राम (६५) या आपल्या शेतात पिकातील कचरा काढण्याचे काम करीत असताना वाघाने अचानक हल्ला करून त्यांचा मृत्यू केला.
मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजता कुंदाबाई आपल्या नातवासोबत दुचाकीने शेतात गेल्या. अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात नातवाने आजीला सोडून घराकडे परतला होता. दुपारी ४ च्या सुमारास नातू आजीला आणण्यासाठी परत शेतात गेला असता त्या तेथे दिसत नसल्याने तो घराकडे आला.
पण घरातही त्या नसल्याने संशय वाढत गेला. त्यानंतर आईसह तो पुन्हा शेतात गेला असता, बांधावर रक्ताचे चिन्ह दिसून आले. तलावाच्या पाळीखाली शोध घेतल्यावर कुंदाबाई यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने त्यांच्या मानेचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले, तर वनविभागालाही घटना कळविण्यात आली.

