चंद्रपूर:- चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (TATR) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे वन विभागाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
ताडोबाच्या कोर झोनमध्ये वन्यजीव संरक्षण नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे. TATR मधील खाजगी कर्मचारी गोविंदा असोपा नावाच्या एका तरुणाने परवानगी नसतानाही थेट ताडोब्यात आपली गाडी थांबवली, खाली उतरला आणि तिथे फोटो आणि व्हिडिओ (रील) शूट केला आहे. ड्रोन उडविला असल्याचीही माहिती समोर आली आहे. हे सर्व सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
ताडोब्यात वाहनातून खाली उतरण्यास बंदी असतानाही हा प्रकार घडला, हे खूप गंभीर आहे. या तरुणाने रील बनवला आणि तो अपलोड देखील केला, पण ताडोबातील अधिकारी काय करत होते? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
ताडोबाच्या बफर झोनमध्ये पर्यटकांना खाली उतरण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही हा तरुण व्हिडिओ बनवतो आणि मुख्य म्हणजे, हा व्हिडिओ बनवण्यासाठी ताडोबातील एका अधिकाऱ्याची गाडी वापरल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या तरुणाला कोणत्या अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे, असा सवाल आता वन्यजीवप्रेमी आणि स्थानिकांकडून विचारला जात आहे.
TATR मधील खाजगी कर्मचारी गोविंदा असोपा या तरुणावर वन विभागाने अद्याप कोणती कारवाई केली आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, या प्रकारामुळे ताडोबाच्या वन्यजीव सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर लवकरात लवकर आणि कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

