गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आणि याच नैराश्यातून दरूर गावातील एका युवा शेतकऱ्याने स्वतःला संपवले आहे. नामदेव सोनटक्के नावाच्या या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्याला यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा फटका बसला. यामुळे हाती आलेले पीक अक्षरशः मातीमोल झाले. याच कारणामुळे गोंडपिपरी तालुक्यातील दरूर गावातील ४२ वर्षीय युवा शेतकरी नामदेव सोनटक्के हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. बुधवारी (दि. ३) दुपारी नामदेव सोनटक्के यांनी आपल्या राहत्या घरीच अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेत ते घराबाहेर पडले. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ते गंभीररित्या भाजले गेले होते.
त्यांना तातडीने चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नामदेव सोनटक्के यांना नागपूरकडे नेत असतानाच, गुरुवार (दि. ४) दुपारच्या सुमारास वरोऱ्याजवळ त्यांचे निधन झाले. नामदेव सोनटक्के यांच्या निधनाची बातमी गावात येताच संपूर्ण दरूर गावावर शोककळा पसरली आहे.

