चंद्रपूर:- चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघात भावाचा प्रचार करत आहेत. तर विरोधात त्यांचा दीर अनिल धानोकर हे वंचितच्या तिकीटावर उभा आहेत. दीराचा प्रचार सासूबाई वत्सला धानोरकर करत असल्यानं या मतदारसंघात सासू-सून आमने सामने असल्याचंच चित्र आहे. दरम्यान, प्रचारावेळी वत्सला धानोरकर यांनी काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक असं विधान केलंय. त्यांच्या विधानामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.
चंद्रपूरचे माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई यांनी काही गंभीर आरोप केलेत. माझ्या मुलाचे म्हणजे बाळू धानोरकर यांचे हे जाण्याचे वय नव्हते. त्याच्या मृत्यूमागे घातपात आहे, असा जाहीर आरोप त्यांनी केला. मात्र या घातपातामागे कोण आहे, हे त्यांनी सांगितले नाही. माझ्या मुलाचं जाण्याचं हे वय नव्हतं. त्याचा घातपात झाला असावा असं मला वाटतं. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं ते आम्हाला माहितीच नव्हतं. खासदार प्रतिभा धानोरकरांच्या मनात काय आहे हे कळायला मार्ग नाहीय. माझ्या मोठ्या मुलाचा आणि माझा ती विरोध करतेय असं दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आईने म्हटलं.
बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू वंचितच्या तिकिटावर वरोरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला मोठ्या मुलाचा प्रचार करीत आहेत. एकीकडे खासदार सून आणि दुसरीकडे सासू, असा संघर्ष वरोरा विधानसभा मतदारसंघात दिसू लागलाय. या घडामोडींमुळे आजपर्यंत एकत्र असलेले धानोरकर कुटुंब विभक्त झाल्याचे चित्रही यानिमित्ताने तयार झाले आहे.