Police News: परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची 'अशीही' माणुसकी!

Bhairav Diwase

परभणी:- परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे काल दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहुन शासकीय कामकाज आटोपून अंबड-घनसावंगी मार्गे परत परभणीकडे जात होते. त्यांना अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर भर उन्हात एक 80 ते 90 वर्षे वयोगटातील वृद्ध आजी दिसली.

वार्धक्याने जर्जर झालेल्या आजीच्या पायातील वाहना अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. या वृद्ध आजीला वयोमानानुसार बोलताही येत नव्हतं. चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची त्यांच्याकडे नजर गेली आणि त्यांनी वाहन थांबवले. आजीला स्वतःजवळ असलेले पाणी पाजून त्यांची आस्थेने चौकशी करत शेजारी असलेल्या झाडाखाली स्वतः हाताने आधार देत नेऊन बसवले.

एवढेच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन मदत केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क करून या आजीला उपचारासाठी हलविण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी बारवाल यांनी तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे यांना घटनास्थळी शासकिय वाहनातून पाठविले.

पोलिसांचे वाहन येईपर्यंत घटनास्थळी असलेल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्ध आजीला पोलीस वाहनात बसवून दिले. त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले. यानंतर अंबड पोलीस यांनी वृद्ध आजीला अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आजी अंबड तालुक्यातील बेलगांव येथील असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.