नांदेड:- विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर रस्त्यावर असलेल्या एका पाणीपुरीच्या दुकानातून सदर विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री पाणीपुरी खाल्ली होती. रात्री उशिरा त्यांना मळमळ- उलट्या होत होत्या.
गुरुवारी सकाळी विष्णुपुरी येथील वॉर्ड क्रमांक ३५ व ५४ मध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारली असून काही विद्यार्थी उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर काहीजण खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
नांदेड येथील विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर रस्त्यावर एक पाणीपुरीचे दुकान असून तेथे पाणीपुरी खाण्यासाठी विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते. रात्री (१६ एप्रिल) नांदेड विद्यापीठ, एस.जी.एस. कॉलेज, ग्रामीण तंत्रनिकेतन या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सदरील दुकानात जाऊन पाणीपुरी खाल्ल्याने त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला. शासकीय, व खासगी रुग्णालयात सदर विद्यार्थी उपचार घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे. संबंधित पाणीपुरी दुकानचालकास तात्काळ अटक करण्यात यावी, त्याची चौकशी करण्यात यावी, तसेच पाणीपुरीचे नमुने अन्न प्रशासन विभागाने तपासावेत अशी मागणी पालकवर्गाने केली आहे.