राजुरा:- राजुरा येथील इन्फंट जिजस कान्व्हेंट स्कूलच्या आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात घडलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल २०१९ रोजी उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला होता. या प्रकरणात वसतिगृहातील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते.
विद्यार्थिनींनी वसतिगृहात प्रवेश घेतला होता. मात्र, त्यांना काय माहित होते की, या ज्ञानमंदिरातच त्यांच्यावर अमानुष अत्याचार होतील? आरोपानुसार, वसतिगृहात या विद्यार्थिनींना गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले होते.
या घटनेनंतर चंद्रपुर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विविध सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चे काढले. पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
सहा वर्षे उलटून गेली तरी पीडित विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा आहे. आरोपी मोकाट फिरत असल्याने पीडित मुली आणि त्यांचे पालक आजही मानसिक त्रासातून जात आहेत. न्याय मिळवण्यासाठी हताश झालेल्या पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी अखेर 16 मे पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरूवात केली आहे. आपल्या मुलींवर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आहे आणि न्याय मिळेपर्यंत ते माघार घेणार नाहीत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या निष्पाप मुलींना न्याय कधी मिळणार? आरोपींना त्यांच्या कृत्यांची शिक्षा कधी भोगावी लागणार? सहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबांचा आक्रोश सरकार दरबारी कधी पोहोचणार? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.