चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि महिलांचे दागिने लुटण्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या जिल्ह्यात काही भामटे गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. हे गुन्हेगार मोटरसायकलवर साध्या वेशात फिरतात आणि स्वतःला पोलीस असल्याचे भासवतात. विशेषतः रस्त्यावर काही कामानिमित्त घरून पायदळ निघालेल्या एकट्या-दुकट्या पुरुष आणि महिलांना हे लक्ष्य करतात. त्यांना दागिन्यांमुळे लोकांची हत्या होत असल्याचे किंवा इतर काही खोटी कारणे सांगतात. त्यानंतर, त्यांनी घातलेले त्यांच्या अंगावरील दागिने तत्काळ काढून एखाद्या रुमालात किंवा कागदात गुंडाळून ठेवण्याबाबत सांगतात. हातचलाखीने, हे गुन्हेगार सदर कागद किंवा रुमालात ठेवलेले दागिने लंपास करून पळ काढतात. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर पोलिसांनी या भामट्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. चंद्रपूर पोलिसांच्या आवाहनानुसार, अशा प्रकारच्या साध्या वेशातील तोतया पोलिसांना त्यांचे ओळखपत्र मागून तात्काळ जवळील पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथील टोल फ्री क्रमांक ११२ वर डायल करून माहिती द्यावी.
चंद्रपूर पोलीस हे गणवेषातच पेट्रोलिंग करतात. ते अशा प्रकारे दागिने काढून रुमालात ठेवण्याबाबत कुणालाही सांगत नाहीत. त्यामुळे, नागरिकांनी अत्यंत सावधानता बाळगावी. अशा भामट्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास, तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे.
नागरिकांच्या सतर्कतेनेच या गुन्हेगारांना पकडणे शक्य होईल. त्यामुळे, सर्वांनी या आवाहनाचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.