सावली:- तालुक्यातील केरोडा (मानकापूर हेटी) येथे एका किरकोळ वादातून थेट खूनाच्या थरारक घटनेत रुपांतर झाले. आंबेडकर चौकात मंगळवारी दिनांक 13 मे रोजी रात्री 9.30 वाजता भरचौकात समीर हरीदास खंडारे (वय 32 वर्षे) या तरुणावर चार जणांनी मिळून धारदार चाकूने सपासप वार करत हत्या केली. या खळबळजनक प्रकरणात दोन अल्पवयीनांसह चार आरोपींना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर खंडारे यांचा गिरीधर वालदे (50) व त्याचा मुलगा अभय वालदे (23) यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की अभयने आपल्या दोन अल्पवयीन मित्रांना बोलावून चौघांनी मिळून समीरवर चाकूने हल्ला केला. मृतकाचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
समीरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून सर्वांना अटक केली. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.