Chandrapur Accident: खाकीचं स्वप्न मात्र काळ बनून धावला ट्रक!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत एका युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.


या अपघातात २२ वर्षीय सानिका कुमरे लक्कडकोट ता. राजुरा नामक मुलीचा जागीच मृत्यू झाला तर काजल आत्राम ता. राजुरा हि गंभीर जखमी तर ५५ वर्षीय नंदा उंबरकर या गंभीर जखमी झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अनियंत्रित झालेला हा ट्रक इतका भयानक होता की तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दुकानात घुसला. यामुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवली. तुकुम परिसर हा चंद्रपूर शहरातील एक अतिशय वर्दळीचा आणि गजबजलेला भाग आहे, जिथे नेहमीच जड वाहनांची आणि लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे चंद्रपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.