ब्रह्मपुरी:- ब्रह्मपुरीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रविवारी, १ जून रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास एका हृदयद्रावक घटनेत एका ३१ वर्षीय युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप स्टेटसवर 'जीवन यात्रा संपवत असल्याचा' संदेश लिहिला होता.
मृत युवकाचे नाव अमोल वांढरे (वय ३१ वर्ष) असून तो वायगाव, ता. ब्रह्मपुरी येथील रहिवासी होता. अमोल हा वीज वितरण कंपनी अंतर्गत बोडेगाव-बेटाळा येथे बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर वायगाव हे अमोलचे गाव आहे. त्याचे मागील वर्षीच लग्न झाले होते आणि तो पत्नी व आई-वडिलांसोबत राहत होता. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तो आपल्या दुचाकीने घरातून बाहेर पडला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने अनेकांसोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली होती.
या घटनेने ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.