चंद्रपूर:- द मराठा चॅरीटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या वतीने १७ ऑगस्ट २०२५ रोजी 'भाऊची दहीहंडी २०२५' आणि 'भव्य वेशभूषा स्पर्धा' न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक येथे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा प्रथमच चंद्रपूर शहरात आयोजित करण्यात आली होती. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, युवा पिढीला साहसी खेळाची संधी देणे, त्यांचे कौशल्य विकसित करणे आणि सामाजिक एकतेला चालना देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मार्गदर्शना दरम्यान सांगितले.
यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, जेष्ठ काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे, शहर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश चोखारे, इंटक नेते प्रशांत भारती, काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक नंदू नागरकर, वरोरा तालुका अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुका अध्यक्ष सुरज गावंडे, संजय पोडे, पंचायत समिती राजुरा माजी सभापती ऍड. कुंदा जेणेकर, सरिता सूर, संध्या पोडे, श्यामकांत थेरे,ए. आय. पी. सी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, रतन शिलावार, कुणाल चहारे, रितेश वाढई यांची उपस्थिती होती.
या दहीहंडी स्पर्धेत चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध युवक आणि युवतींच्या पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या लढतीत, जय शितला माता मंडळ, बाबूपेठ वार्ड, चंद्रपूर येथील गोविंदांनी ६ थरांची भव्य मानवी साखळी तयार करून हंडी फोडली आणि रु. १,५१,००० चे प्रथम पारितोषिक पटकावले. महिला गोविंदा पथकांची दमदार उपस्थिती देखील वाखाण्याजोगी होती. गोपिका गर्ल्स, बल्लारपूर या महिला पथकाने ४ थरांची सलामी देत सर्वांची मने जिंकली आणि त्यांना प्रोत्साहनपर परितोषिकाने गौरवण्यात आले.
दहीहंडी उत्सवाच्या जोडीलाच 'भव्य वेशभूषा स्पर्धे'मध्ये चिमुकल्यांनी 'भारतीय संस्कृती' आणि 'भारतीय इतिहासातील महापुरुष' या विषयांवर मनमोहक सादरीकरण केले. या स्पर्धेत ६५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पृहा वाटेकर हिने रु. ५,००० चे प्रथम बक्षीस पटकावले, तर सान्वी लालसरे हिला रु. ३,००० चे द्वितीय बक्षीस आणि सानिधी इटनकर हिला रु. २,००० चे तृतीय बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यासोबतच १० स्पर्धकांना प्रोत्सानपर पारितोषिक देण्यात आले. चंद्रपूरकरांच्या प्रचंड उपस्थितीने, तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि “गोविंदा आला रे आला!” या घोषणांनी दहीहंडी सोहळ्याला वेगळेच आकर्षण लाभले.