चंद्रपूर जिल्ह्याला फटका; अनेक मार्ग बंद
चंद्रपूर:- जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ आणि तेलंगणातील धरणांमधून पाणी सोडल्याने वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यवतमाळ आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इसापूर आणि सातनाला या दोन महत्त्वाच्या धरणांचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. या पाण्याचा थेट परिणाम चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि पैनगंगा नद्यांवर झाला आहे. या नद्यांना रविवारी पूर आला असून, अनेक गावांना याचा फटका बसला आहे.
या पुरामुळे चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काही शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतपिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर नसतानाही, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
भोयेगाव पुलावरून सुमारे १३ ते १४ फूट उंचीवरून पाणी वाहत होते. त्यामुळे चंद्रपूर, गडचांदूर आणि घुग्घुसकडे जाणारे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नदीकाठावर बॅरिकेड लावून काही मार्ग बंद केले आहेत. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.