Local Government Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

Bhairav Diwase

ओबीसी आरक्षण आणि नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका


मुंबई:- राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुका २७ टक्के इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासह आणि नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील, हे आता स्पष्ट झाले आहे. याला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावल्या.

लातूरमधील औसा नगरपालिकेची निवडणूक ११ मार्च २०२२ पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार घेतली जावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. तसेच, ओबीसी आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असून त्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकार असताना प्रभाग रचना बदलण्यात आली होती. पण, त्यानंतर महायुती सरकारच्या काळात त्यात पुन्हा बदल करण्यात आला. या बदलाला आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नव्या प्रभाग रचनेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील ही बाब स्पष्ट झाली. सध्या सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने प्रभागांची रचना करण्याची प्रकिया प्रगतिपथावर आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडल्या होत्या. या संदर्भातील आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ६ मे २०२५ रोजी २७ टक्के आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.