Vijay Wadettiwar: रुग्ण झोळीत, मंत्री हवेत; हा निष्क्रिय सरकारचा आरसा : वडेट्टीवारांचे टीकास्त्र

Bhairav Diwase


गडचिरोली:- जिल्ह्यात एका रुग्णाला उपचारासाठी झोळीतून न्यावे लागल्याच्या हृदयद्रावक घटनेवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "एकीकडे राज्याला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आदिवासी बांधवांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जीव गमवावा लागत आहे. ही घटना निष्क्रिय महायुती सरकारच्या कारभाराचा आरसा आहे, अशा शब्दात त्यांनी रविवारी सरकारवर टीकास्त्र सोडले.


वडेट्टीवार यांनी सरकारवर दिखाऊपणाचा आरोप केला. ते म्हणाले, "महाराष्ट्राचे खरे, भीषण वास्तव झाकून फसवे आकडे, पोकळ योजना, परदेशी दौरे आणि गुंतवणूक परिषदांचा देखावा कशासाठी? ज्यांच्या हातात मुख्यमंत्रीपद होते आणि जे आता आहेत, ते दोघेही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकेकाळी गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांच्याच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची काय अवस्था आहे, हे या घटनेतून स्पष्ट दिसते."


त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "जिथे आजही लोकांच्या पायात चप्पल नाही, आणि आजारी माणसाला झोळीतून रुग्णालयात न्यावे लागते, तिथे मंत्री मात्र हवेत उड्डाणे मारत आहेत," असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.


यावेळी त्यांनी सहपालकमंत्री पदावरही टीका केली. "महायुतीचे सहपालकमंत्री केवळ 'पद' घेऊन बसले आहेत, पण जबाबदारीपासून कोसो दूर पळत आहेत," असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सरकारच्या दाव्यांतील सत्यता समोर आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.