नागपूर:- स्वतंत्र विदर्भाची मागणी तीव्र करण्याच्या उद्देशाने विदर्भ राज्य आंदोलन समितीने क्रांती दिनी, शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी नागपूरच्या संविधान चौकात 'महाराष्ट्रवादी और विदर्भ विरोधी चले जाओ' या नावाने आंदोलन जाहीर केले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत हे निदर्शने आंदोलन होणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून प्रेरणा घेऊन, घटनेतील कलम ३ नुसार केंद्र सरकारने तातडीने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
समितीच्या मते, महाराष्ट्र सरकार दिवाळखोरीच्या मार्गावर असून, राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यावर ७ लाख ८२ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्यावर ५६ हजार ७२७ कोटी रुपयांचे व्याज द्यावे लागत होते. आता घेतलेल्या कर्जासह ३० सप्टेंबरपर्यंत राज्यावरील एकूण कर्ज ९ लाख ८३ हजार ७८७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे महाराष्ट्र सरकार विदर्भाचा सिंचनाचा ६० हजार कोटी रुपयांचा आणि सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, रस्ते, पिण्याचे पाणी, ग्रामविकास, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागांचा १५ हजार कोटी रुपयांचा अनुशेष भरून काढण्यास असमर्थ आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे विदर्भातील सिंचन क्षमता वाढू शकत नाही, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे समितीचे म्हणणे आहे.
तसेच, दरडोई उत्पन्नात वाढ न झाल्यामुळे कुपोषण, माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होणार नाही. औष्णिक वीज प्रकल्पांमधून होणारे प्रदूषण नियंत्रित करणेही अशक्य झाले आहे. रोजगाराच्या संधी नसल्यामुळे तरुणांचा नक्षलवादाकडे कल वाढत आहे आणि बेरोजगारीमुळे स्थलांतर थांबत नाहीये. परिणामी, विदर्भातील लोकप्रतिनिधींची संख्या (४ आमदार आणि १ खासदार) कमी झाली आहे. या सर्व समस्यांवर 'स्वतंत्र विदर्भ राज्य' हाच एकमेव पर्याय असल्याचे समितीने म्हटले आहे.
९ ऑगस्टच्या आंदोलनानंतर विदर्भ राज्याची मागणी पूर्व विदर्भात गावागावांत पोहोचवण्यासाठी आणि आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोंदिया येथे 'विदर्भ निर्माण संकल्प मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. यशोदा सभागृहात दुपारी १२ ते ४ या वेळेत हा मेळावा होईल. या मेळाव्यात पूर्व विदर्भातील विदर्भवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.