चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दीक्षाभूमी परिसरामध्ये भाजप आमदार आणि त्यांच्या पक्षाकडून 'अम्मा की पढाई' या नावाखाली एक नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाने याला "पवित्र दीक्षाभूमी हडपण्याचा भाजपाचा दीर्घकालीन कट" असे म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी या संदर्भात एक प्रेस नोट जारी केले असून, यामध्ये त्यांनी भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, भाजप आणि आरएसएस देशातील पवित्र बौद्धस्थळांना मनुवादी ओळख देण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूर आणि आता चंद्रपूर येथील दीक्षाभूमी परिसरात हे दिसून येत आहे.
राईकवार यांनी म्हटले आहे की, गांधी चौक परिसरात "अम्मा चौक"चा प्रस्ताव आणि दीक्षाभूमी परिसरात "अम्मा की पढाई" या नावाखाली केंद्र सुरू करणे हे त्याच षड्यंत्राचा भाग आहे. "हे केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे," असे त्यांनी सांगितले. हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आणि पवित्र दीक्षाभूमी म्हणून ओळखला जातो, मात्र आता तिथे एक तिसरी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे राईकवार म्हणाले.
सध्या महापालिकेच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामावरही 'आप'ने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जर हे केवळ सौंदर्यीकरण असेल, तर त्याचे डिझाइन जनतेसमोर का सादर केले जात नाही?" असा सवाल राईकवार यांनी केला आहे. तसेच, जर डिझाइन बदलणे शक्य असेल, तर कोणताही गुप्त अजेंडा उघड होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
या सर्व प्रकाराला "बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास पुसण्याचा आणि मनुस्मृती लादण्याचा भाजप-आरएसएसचा डाव" असे राईकवार यांनी म्हटले आहे. "उद्या हे लोक पालिकेत ठराव आणून दीक्षाभूमीला 'हेडगेवार स्मारक' करण्याचाही प्रयत्न करू शकतात," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आम आदमी पक्षाने या प्रकरणी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१) पवित्र दीक्षाभूमी परिसरात तिसरी ओळख निर्माण होऊ नये.
२) सौंदर्यीकरणाच्या डिझाइनची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी.
३) दीक्षाभूमी परिसरात कोणत्याही तिसऱ्या ओळखीचा प्रयत्न थांबवावा.
"हा लढा सत्यासाठी, संविधानासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी आहे," असे सांगत आम आदमी पक्षाने जनतेच्या मदतीने हे षड्यंत्र उधळून लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.