Chandrapur News : विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा मृत्यू

Bhairav Diwase

मूल:- तालुक्यातील जुनासूर्ला येथे घराच्या बांधकामावर काम करत असलेल्या दोन मजुरांचा विजेच्या जबर धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१७) सकाळी ९.४५ वाजता घडली. पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे अकरा केव्ही विद्युत तारेला स्पर्श झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने नवेगाव भूजला आणि जुनासूर्ला येथे शोककळा पसरली आहे. विनोद मुकुंदा बोरकूटे (वय ४०) आणि हरिदास शशिकांत चुधरी (वय २८) अशी मृतांची नावे आहेत.


मूल तालुक्यातील जुनासूर्ला गावात दिलीप गिरडकर यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मजूर बांधकामावर आले होते. काम सुरू असताना घराच्या वरून गेलेल्या अकरा केव्ही विद्युत तारेला स्पर्श होऊन मुकुंदा बोरकूटे व हरिदास चुधरी या दोघांना जबर धक्का बसला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.


पावसाळी हवामानामुळे बांधकामावर ओलावा निर्माण झाला होता. त्या ओलाव्यामुळे विद्युत प्रवाहाचा धक्का बसला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नवेगाव भूजला येथील ग्रामस्थ आणि मृतांच्या नातेवाईकांनी शोक व्यक्त केला. दोघेही कुटुंबाचा आधारस्तंभ होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूने मोठा आघात झाला आहे.


या घटनेची नोंद बेंबाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. विद्युत विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला असून मजुरांनी कामाच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.