चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी, खासगी वाहनांवर धार्मिक संदेश देणारे बॅनर्स/पोस्टर्स लावताना तसेच सोशल मीडियावर संदेश पोस्ट करताना इतर कोणत्याही धर्म किंवा जातीय समूहाची भावना दुखावली जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी सर्व नागरिकांना केले आहे.
ऑटो संघटनांची बैठक:
याच पार्श्वभूमीवर, दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात चंद्रपूर शहरातील सर्व ऑटो संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी ऑटो चालक व मालक संघटनांना स्पष्ट आवाहन केले की, त्यांनी आपापल्या वाहनांवर धार्मिक भावना दुखावतील असे आक्षेपार्ह बॅनर व पोस्टर्स लावू नयेत. तसेच, सोशल मीडियावरही अशा प्रकारचा कोणताही संदेश प्रसारित करू नये.
नागरिकांना आवाहन:
याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, धार्मिक संदेश देणारे बॅनर्स आपल्या खाजगी वाहनांवर किंवा इमारतींवर लावताना तसेच सोशल मीडियावर कोणताही संदेश पोस्ट करताना इतरांच्या धार्मिक भावना जपण्याची विशेष काळजी घ्यावी. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, जर त्यांना कुठेही कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा माहिती आढळल्यास, त्यांनी सर्वप्रथम त्वरित पोलिसांना अवगत करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांना सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.