भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं दुबळ्या वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४० धावांनी पराभव केला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं १ - ० अशी आघाडी घेतली आहे. भारतानं आपल्या पहिल्या डावात ४४८ धावा करत डाव घोषित केला होता. त्यानंतर भारतानं पहिल्या डावात १६२ धावा करणाऱ्या विंडीजचा दुसरा डाव १४६ धावात संपवला. भारताकडून मोहम्मद सिराजनं ३ तर रविंद्र जडेजानं ४ विकेट्स घेतल्या. भारतानं हा सामना अडीच दिवसातच संपवला.
अहमदाबाद कसोटी वेस्ट इंडीजनं सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ १६२ धावात माघारी परतला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला होता. त्याला कुलदीप यादवनं चांगली साथ दिली होती. सिराजनं ४ तर बुमराहनं ३ फलंदाज बाद केले. विंडीजकडून जस्टीन ग्रेवेस यानं सर्वाधिक ३२ धावा केल्या.
यानंतर भारतानं आपल्या पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून तिघांनी शतकी खेळी केली. सलामीवीर केएल राहुलनं १०० धावा तर विकेटकिपर ध्रुव जुरेलनं १२५ धावांची खेळी केली. त्याला रविंद्र जडेजानं १०४ धावांची दमदार शतकी खेळी केली.
भारतानं दुसरा डाव ४४८ धावांवर घोषित करत २८६ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजचा निम्मा संघ ६० धावात गारद झाला. त्यानंतर टी ब्रेकपर्यंत भारतानं वेस्ट इंडीजचा दुसरा डाव १४६ धावात संपवला.
दुसऱ्या डावात देखील मोहम्मद सिराजनं धमाका केला. त्यानं ३ विकेट्स घेत विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. दुसऱ्या बाजूनं रविंद्र जडेजानं ४ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. सिराजनं सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनं देखील पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावत २ विकेट्स घेत भारताच्या विजयाला हातभार लावला.
पहिल्या कसोटीचा सामनावीर म्हणून रविंद्र जडेजाची निवड करण्यात आली. त्यानं फलंदाजी करताना १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या डावात त्यानं विंडीजच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडत गोलंदाजीतही चुणूक दाखवली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आता १० ऑक्टोबरपासून दिल्लीत सुरू होणार आहे.

0 टिप्पण्या