चंद्रपूर:- जिल्ह्याच्या मूल शहरातून अपघाताची बातमी समोर येत आहे. आज सकाळी मूल बसस्थानकासमोर राज्य परिवहन महामंडळाच्या बसला एका ट्रांझिट मिक्सर ट्रकने धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
सकाळी साधारण साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. पोंभुर्णा वरून मूलकडे येणारी MH07 C 9313 क्रमांकाची बस जेव्हा बसस्थानकासमोर पोहोचली, त्याचवेळी तेलंगणा राज्यातील TS22 T 1061 क्रमांकाच्या ट्रांझिट मिक्सर ट्रकने तिला धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे. बस आणि ट्रक दोन्ही बाजूंचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी लवकरच ती पूर्ववत केली.