Old carved stone: खोदकामात आढळले जुने कोरीव पाषाण

Bhairav Diwase

कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील भवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम करताना शुक्रवारी दि. ३ ऑक्टोबरला जुने कोरीव पाषाण आढळले. ही माहिती पसरताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. भवानी माता मंदिर हे प्राचीन असल्याचे मानले जाते. आधीचे बांधकाम पडल्यामुळे काही वर्षांपूर्वी नवे मंदिर बांधण्यात आले होते.

जुन्या मूर्ती खंडित झाल्याने नव्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या. आता मंदिराला भव्य रूप देण्यासाठी गावकरी व भाविकांच्या सहयोगातून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले. शुक्रवारी पायव्याचे खोदकाम सुरू असताना जमिनीत पाच कोरीव पाषाण आढळून आले. हे पाषाण जुन्या मंदिराचाच अवशेष असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पाषाण पाहण्यासाठी दिवसभर लोकांची गर्दी उसळली. तालुक्यातील नारंडा, अंतरगाव, कारवाई, सांगोडा, देवघाट, कुसळ, दुर्गाडी, रूपापेठ, सिंगारपठार, कारगाव, कोडशी बूज, तामसी, चनई खु, जांभूळधरा, गडचांदूर, इजापूर गावात यापूर्वी पुरातन अवशेष आढळून आले. पुरातत्व विभागाने या स्थळाची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.