चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर आज, दिनांक 07/10/2025 रोजी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तुकूम परिसरात सापळा रचून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 11 लाख 62 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने तुकूम परिसरात सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले:
1. मुदसिर नासिर शेख हुकूम (वय 21 वर्षे, रा. तुकूम, चंद्रपूर)
2. शेख मुस्तफा शेख रहीम (वय 24 वर्षे, रा. अकोला, जि. अकोला)
3. अब्दुल राजे अब्दुल रशीद (वय 39 वर्षे, रा. अकोला, जि. अकोला)
या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे 60 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (Mephedrone Drug - MD) हा अमली पदार्थ जप्त केला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 4,20,000/- रुपये इतकी आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
मेफेड्रोन ड्रग्जसह पोलिसांनी आरोपींकडून एकूण 11,62,160/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यात पुढील वस्तूंचा समावेश आहे:
1. 60 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज (किंमत 4,20,000/- रु.)
2. एक काळ्या रंगाची XUV 300 कार (अंदाजित किंमत 7,00,000/- रु.)
3. चार मोबाईल फोन (अंदाजित किंमत 26,000/- रु.)
4. नगदी 16,160 रुपये.
सदरची उल्लेखनीय कामगिरी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो. नी. श्री. संदीप एकाडे पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रविण बिंकलवार, पो. हवा. योगेश शार्दुल, मंगेश शेंडे, रुपेश सावे, किशोर वलके, सोनल खोब्रागडे, मोरेश्वर गोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.