Police raid: एका कापडी तंबूत सुरू होता जुगाराचा अड्डा; पोलीसांची धाड

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी चिमूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजा रेनगाबोडी आणि जामणी जंगल शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर, चिमूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पंचांसह तातडीने सदर ठिकाणी धाड (रेड) टाकली.


पोलिसांनी धाड टाकली असता, एका कापडाच्या तंबूमध्ये काही व्यक्ती ताश पत्त्यावर हार-जितची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकूण १० आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले. यामध्ये सुधीर पोहीनकर (रा. जामनी), रजतकुमार नागवंशी (रा. छिंदवाडा), पांडुरंग रामाजी फलके (रा. समुद्रपूर), अमन भोसले (रा. सेलु), सुरज कोपरकर, फकीरा काकरवार (रा. सेलु), मंगेश गुडघे (रा. कोरा), सुखदेव अवचट (रा. समुद्रपूर), सचिन धोटे (रा. समुद्रपूर) आणि नुमान कुरेशी (रा. भद्रावती) यांचा समावेश आहे.


मात्र, आरोपी नामे गोलु राऊत (रा. समुद्रपूर), जिवन सिडाम (रा. जामणी) आणि अनिल जाधव (रा. शेगांव) हे तिघे अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या सर्व १३ आरोपींविरुद्ध चिमूर पोलीस स्टेशनमध्ये जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम, ०६ चारचाकी वाहने, ०३ दुचाकी वाहने, चार्जिंग बॅटरी, सतरंजी, एलईडी आणि इतर साहित्य असा एकूण २७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमूर, दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चिमूरचे ठाणेदार, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकामध्ये सपोनि अमोल बारापात्रे यांच्यासह सचिन सायंकार, अतुल ढोबळे, निलेश बोरकर, कुणाल दांडेकर, गणेश वाघ, हर्षल शिरकुरे, उमेश चरफे, रोहित तुमसरे, फाल्गुन परचाके, सौरभ महाजन, आणि अविनाश राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पुढील तपास चिमूर पोलीस करत आहेत.