सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी गावात १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाचा धारदार चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू आनंदराव सिडाम (वय ३९, रा. मोहाळी) असे मृत युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, ही घटना घडल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी, म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली, ज्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबरच्या सकाळी राजू सिडाम आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. याच वादाचा राग मनात ठेवून आरोपी महेंद्र भोजराज पारधी आणि मयूर रामदास वाघमारे हे सायंकाळी राजू सिडाम याला धमकावण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेथे पुन्हा एकदा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या महेंद्र पारधीने जवळ असलेल्या धारदार चाकूने राजू सिडामच्या गळ्यावर वार केला.
यावेळी मयूर वाघमारे याने महेंद्रला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र महेंद्रने त्यालाही धमकावले. या झटापटीदरम्यान भांडे पडल्याचा आवाज झाला. त्यानंतर आरोपींनी जखमी झालेल्या राजू सिडाम याला ओढत मधल्या खोलीत नेले आणि पुन्हा त्याच्या पोटात चाकूने वार करून ठार मारले. राजूचा जागीच मृत्यू झाला.
तपास आणि अटक:
घटनेवेळी राजूचा मित्र रवी उर्फ लाडू गरमाडे हा देखील उपस्थित होता. त्यामुळे सुरुवातीला संशयावरून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले होते. मात्र, सखोल तपासानंतर त्याचा खूनप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि त्याची सुटका करण्यात आली.
या गंभीर प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी त्वरित तपास करत मुख्य आरोपी महेंद्र भोजराज पारधी (वय २६) आणि मयूर रामदास वाघमारे (वय २४) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, P.C.R. (पोलीस कोठडी रिमांड) मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुंमका सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक कंचन पांडे यांच्या देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम यांनी या प्रकरणाचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला. तपास पथकात दर्शन लाटकर, संजय जुमनाई, आफताब शेख, हत्ताजी रामरेडे, नारायण येगेवार, सुनिल डोंगरे आणि मधुकर आत्राम यांचा समावेश होता.