चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे युवासेनेचे मोठे नाव असलेले प्रा. निलेश बेलखेडे यांचा भाजप प्रवेश.
आज गांधी चौक येथील भाजपच्या नूतन कार्यालयात एका विशेष पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य आणि माजी युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाचा दुपट्टा टाकून सन्मानपूर्वक पक्षात सामील करून घेण्यात आले.
प्रा. निलेश बेलखेडे यांचा हा प्रवेश चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना उबाठा (युवासेना) संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शैक्षणिक आणि युवक वर्गात मोठा प्रभाव असलेले बेलखेडे आता भाजपसोबत आल्याने, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठी ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

